ll फटाकडीll
लेखक : निशिकांत हारुगले.
एम ए बी. एड.
गणेश चतुर्थी दिवस, वेळ सकाळी घरी प्रत्येकाच्या लगबग चाललेली. संदेश आपल्या वडील बरोबर गणपती आणायला जातो.
अनेक लोक गणपती घेऊन जात असतात. ते ही गणपती घेऊन घरी येतात. येताना, ‘गणपती बाप्पा मोरया'. घोषणा ते देत असतात. घरात अरास केलेली असते. त्यामध्ये गणपती प्रतिष्ठापना करतात. गल्लीतील मुले फटाके वाजवत असतात.
संदेश,
“ बाबा , मला पण फटाकड्या पाहिजेत.”
बाबा सुरेश,
“ तू लहान आहेस. तुला बंदूक व केपा आणलेत. मम्मीकडे आहेत. घे जा.”
वडील कामानिमित्त बाहेर जातात. व संदेश जेवण खोलीत जातो. आई स्वयंपाकाच्या गडबडीत असते.
संदेश,
“ आई मला बाबांनी आणलेली बंदूक दे.”
आई उमा,
“ आता मी कामात आहे. मला मोदक बनवायचे आहेत. नंतर देते.”
संदेश,
“ ते काय मला माहित नाही. आताच दे.”
तो दंगा करू लागतो.
उमा,
“ काय बाई वैताग नुसता आहे. लगेच कशाला सांगितलं असेल. मालकाला कळतच नाही. थांब देते.” आई उमा त्याला बंदूक कपाटातील काढून देते. व केपा सुध्दा देते.
संदेश पुढल्या अंगणात जातो. व रिल घालून बंदूक वाजवू लागतो. त्याची बहीण ते पाहते. व त्याच्या जवळ जाते.
श्रावणी,
“ संदेश मला दे की फटाकडी वाजवायला.”
संदेश,
“ मी नाही. जा.”
श्रावणी त्याची बंदूक काढून घेते. व आपण वाजवू लागते. संदेश रडत घरात जातो. व जेवणखोलीत भांड्यांची आदळ आपट करतो.
उमा,
“ काय झाल आता.”
संदेश,
“ दिदीन माझी बंदूक काढून घेतली.”
आई बाहेर येते. तिच्या मागोमाग संदेश येतो.
आई श्रावणीच्या हातातील बंदूक घेते. व संदेशला देते.
श्रावणी,
“ मला पण पाहिजे. बंदूक अन फटाकडी.”
आई,
“तुला कशाला पाहिजेत. बंदूक फिंदूक. तू रांगोळ्या काढ. झाडलोट कर. ते काम तुझं. सोड ती बंदूक.”
आई बंदूक काढून घेते. व संदेशला देते.
श्रावणी,
“ मला ते काही माहीत नाही मला पण पाहिजे.”
ती काढून घेऊ लागते. तेव्हा आई तिला दोन धपाटे घालते.ती रडू लागते.
तिचा आवाज ऐकून आजी आतून बाहेर येते. व तिला जवळ बोलवते.
आजी कौसल्या,
“ काय झाल रडायला आता.”
श्रावणी,
“ माझी बंदूक काढून संदेशला दिली . मला पण फटाकड्या पाहिजे.”
आजी कनवटीचे पैसे काढून देते.
आजी कौसल्या,
“ हं हे घे अन् जा आणायला. केपा.”
ती डोळे पुसते. व धावत दुकानात जाते. तेथे खूप गर्दी असते. ती त्यात मधूनच घुसते.
व दुकानदारास
श्रावणी,
“ काका, ओ काका, मला केप द्या.”
दुकानदार,
“ अरे, श्याम त्या मुलीला केपा दे बघू.”
श्याम,
“ बर मालक.”
श्याम तिच्याकडून पैसे घेतो. व तिला केपांचे बंडल देतो. ते घेऊन ती पळत घरी येते. आज्जीजवळ येऊन.
“ केपा दिल्यास वाजवायच्या कशान. बंदूक तर संदेशकडे आहे.”
आजी कौसल्या,
“ थांब.”
आजी आत जाऊन कपाटातील हातोडी आणून देते. व दोन फटाकडी वाजवून दाखवते.
आजी,
“ हे बघ वाजवून झाल की हातोडी कपाटात ठेव. नाहीतर तुझा बाप ओरडायचा.”
श्रावणी,
“ हे आपल बर आहे की. त्याला बंदूक मला का नाही.”
आजी कौसल्या,
“ अग, ती बंदूक दोन दिवसात मोडेल तो. पण हातोडी नाही समजल. आपण मुलीन पाण्यासारखं असावं. जिथं जाईल त्याला आकार व मार्ग निर्माण करावा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडू नये.त्याला बंदूक दिली. ते दिसले. पण त्याच्या दुप्पट मेकपचे साहित्य तू घेतलस. नाही का?”
श्रावणी,
“ हो, म्हणून.”
आजी कौसल्या,
“ त्यात काय तुला भेदभाव दिसतो ना. अग मवाळ राहून सत्ता गाजवतात बायका. तुझी आई बघ कशी तुझ्या बापाला गोड बोलून फसवते तस. जंगलचा राजा सिंह असला तरी दरारा वाघाचाच असतो. तस आन वाद न घालता फटाकडी वाजवायची कशी तर अशी.”
आजी हातोडी घेऊन फटाकडी वाजवते.”
श्रावणी हसते. व फटाकड्या वाजवू लागते.