Inter / outer /In collage / Morning.
(बेल वाजते. तासिका सुटलेली आहे. कॉलेजच्या व्हरांड्यात प्राजक्ता जिन्यावरून वर येताना आरोही समोरून जाते. तिचा चेहरा नाराज असतो. वर एका बाजूला मुली एकत्र येऊन गप्पा मारत आहेत.)
माधवी :
लेक्चर प्रॅक्टिकल झालं एकदास.
वेदिका :
तर काय,... वेताग आला होता.
(पाठीमागून प्राजक्ता येते. तिच्या हातात पिसव्या असतात. त्यामधे आईस्क्रिम असते. त्या समोर धरत.)
प्राजक्ता :
हा घ्या. व्हा जरा थंडगार.
(प्रत्येक मुलगी एक एक आईस्क्रिम घेते. व थॅन्क्स बोलते.)
प्राजक्ता :
(वेदिकाकडे पहात )
काय ग मघाशी जिन्यावरून येताना पाहिलं. त्या अरोहीचा चेहरा पडलेला का होता.
वेदिका :
मॅडम दुःखात आहेत.
प्राजक्ता :
काय ग, काय झालं?.. सगळ ठीक आहे ना. की घरी कोण?
( प्राजक्ता वर हात करून इशारा करत )
वेदिका :
ये बाई तसं काही नाहीं ह.
प्राजक्ता :
मग काय झालंय?
वेदिका :
काल रात्री दुःखद निधन झालं. मॅडमच्या लाडक्या ड्रेसचं.
प्राजक्ता :
म्हणजे काय, नीट सांग की रेड्या.
वेदिका :
अरोहि मॅडमचा ड्रेस हॉस्टेलच्या उंदरांनी कुर्तडला.
प्राजक्ता :
अरेरे, वाईट झालं.
सर्व जणी एकदम :
काय म्हणालीस…..
रेवा :
प्राजे तिची दया माया करायची नाही काय, आख्या कॉलेजात विरुद्ध पार्टी कोण असेल तर फक्त तिच.
प्राजक्ता :
अग पण असं शत्रूच ही होऊ नये ग..
वेदिका :
ये गप्प उगाच माठातल्या पाण्यासारखी पाझरू नकोस हं..
प्राजक्ता :
बरं मॅडम तुम्ही म्हणाल तस्.
एक सांगा काल पाठवलेलं वेळापत्रक पाहिलात का? ते फॉलो करायचं काय?
श्वेता :
ते जरा कडक वाटतयं.
जरा झोपायची वेळ वाढवली तर बरं होईल.
प्राजक्ता :
जरा स्वाभिमान बाळगा उगाच वेळ घालवू नका . घाटी मुली अन् एवढा आळस बरा नाही. सूर्य उगवे पर्यंत घोरत पडायला पाहिजे. ते काही नाही आज कॉलेज सुटल्यावर मी सांगते तिकडे चलायचं.
अनुजा :
कुठे जायचं. फिरायला का?
प्राजक्ता :
हो जायचय इथल्या महादेवाच्या देवळात. शपथ घ्यायला.
वेदिका :
आम्ही फॉलो करतो की, उगाच शपथ कशाला.
प्राजक्ता :
ते काही नाही, शपथ घ्यायची म्हणजे घ्यायची. मला व माधवीला सोडली तर ग्रुप मधील बाकीच्या मुलींची मार्कांची गाडी कायम खालीच असते.तेव्हा काही कडक नियम पाळले पाहिजेत.
श्वेता :
असं काय बोलत आहेस. तब्येत ठिक आहे ना तुझी.
रेवा :
काही लागिर बिगिर झालं नाही ना?
प्राजक्ता :
होय लगिरलं आहे मला स्वाभिमानी वृतीन. अरोहीने दिलेल्या आव्हानानं. ते काही नाही, मी आज संध्याकाळी शिव मंदिरापाशी सहा वाजता वाट पाहीन. तुम्ही आलात तर ठिक नाहीतर मी एकटी पैजेला सामोरी जाईन.
Cut to……
............. ........... ............ ..........
Evening/ Outer – inter / shiv temple
प्राजक्ता आपल्या मैत्रिणीची वाट पाहत आहे. त्या आजुन आलेल्या नाहीत. ती इकडे तिकडे फिरत आहे. घड्याळात सहाचे ठोके वाजणार आहेत.
प्राजक्ता :
अजून कशा आल्या नाहीत. आता पर्यंत यायला पाहिजे होत्या.
(ती मोबाईल फोन करते. रिंग वाजते.)
येतात की नाहीत. की गेल्या कुठे.
जाऊदे सहापर्यंत वाट पाहू नाहीतर आपण स्वतः शपथ घेवू.
(घड्याळात सहाचे टोले पडतात.)
प्राजक्ता :
येत नाहीत वाटत.
जाऊ दे, मी जाते.
(मागून हाक येते.)
श्वेता :
प्राजू…
(त्या सर्व एकापाठोपाठ एक येतात. त्या सर्व मंदिरात जातात. दीप प्रज्वलन करुन शपथ घेतात.)
ऐकत्र सामुहिक:
आम्ही सर्वजणी आज् या महादेवस साक्षी मानून अशी शपथ घेतो की शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होऊन आपली प्रगती करून या वर्षी होणाऱ्या परीक्षेत यशस्वी होऊ. व छत्रपती शिवरायांच्या तत्वाने पुढे जाऊ. व प्रगती करुन यश संपादन करू. व जीवनात शिवरायांचे तत्व अंगिकरू व रायगड पायी सर करू.
(प्राजक्ता त्यांना खडीसाखर व पेढे वाटते.)
Cut to…….
…….. ……. ………. …
Next day / morning ५.०० clock / hostel and ground. / Inter – outer
मुली झोपलेल्या आहेत. घड्याळाचा अलार्म वाजतो. श्वेता उठून केस बांधून मुलींना उठवण्याचा प्रयत्न करते. हाका मारते. त्या उठत नाहीत. तेव्हा त्यांच्या अंगावर पाणी आणून ओतते.
त्या उठतात.
रेवा :
श्वेता काय हे. अस करतात का?
श्वेता :
मग पहिल्या हाकेला उठत जा. शपथ घेतलीये ना. मग तिचे पालन करा.
चला लवकर.
(त्या हॉस्टेलच्या प्रांगणात येतात. व एक्सरसाईज करु लागतात. सकाळी वॉश रुमला जाणारी आरोहीची रुममेट मानसी कोंढाणे त्या मुलींना एक्सर साई ज करताना पाहते व)
मानसी कोंढाणे :
(मनात)
कसला आवाज येतोय. कोण आहे.
(मानसी गच्ची मध्ये येते.)
मानसी :
( मनात)
काय करताहेत या. आ…, एक्सरसाईज अरोहिला सांगितलं पाहिजे .
( मानसी रुमकडे धावत जाते. मानसी आरोहीला हलवत,)
मानसी :
ऐ आरोही उठ लवकर. चल लवकर बाहेर बघ चल काय चाललेय ते.
आरोही :
काय चाललंय, झोप मोड करू नकोस. उगीच किरकिर सकाळी कशाला करतेस.
मानसी :
चल तरी, ती श्वेता व तिचा गँग बघ चल काय करताहेत.
आरोही :
काय करताहेत.
मानसी :
बघ तरी.
आरोही :
चल पाहू.
(आरोही आपला चष्मा डोळ्यावर लावते. व उठून हॉस्टेलच्या गॅलरीत येते. श्वेता व तिच्या मैत्रिणींना एक्सरसाईज करताना पाहून,)
आरोही :
काय मानसी पोलीस भरतीत उतरणार आहेस वाटत? मला वाटलेच होते की हे फार्मसी बीर्मसी तुझ काम नव्हे.
(श्वेताच्या लक्षात अरोहीचें बोलणे येते. पण लक्ष न देता ती एक्सरासाईज करत ती लक्ष देत नाही.
इतक्यात आरोहीची दुसरी रुममेट तन्वी तिथे येते.)
आरोही :
( रेवाकडे पहात)
काय तन्वे किती केलं तरी सरड्याची धाव कुंपणापर्यंत बघ. आपणं केवढं, आपल वजन केवढं. लई आपटून घेवू नकोस. नाहीतर फुटशील भोपळ्या सारखी.
(तन्वी व मानसी हसतात. तिचे बोलणे ऐकून रेवा,)
रेवा :
ये आरे, तोंड सांभाळ, कुणाला भोपळा म्हणतेस, मला कळत नाही का? ऐका गुच्चीत गार करीन.
आरोही :
तुला कोण म्हणत. मी तर तन्वीला बोलले. तुला भोपळा म्हणणे म्हणजे भोपळ्याचा अपमान वाटतो. काय ग तनु
रेवा :
त्या खिडमीडीच्या अंगात केळ्या एवढं तरी मास आहे का? तुझे टाँटस् कळतात मला. एक बसली की फिरसिल गरगर.
आरोही :
ए जाडे, आधी पकडून दाखव मला, काल माझा ड्रेस उंदरांनी कूर्तडला तेव्हा मला पाहून कॉलेजमध्ये खिदळत होतीस ना. मला काय कळत नाही का?
अनुजा :
( मध्येच बोलत)
कोण म्हणते तुला बघुन हसत होतो, तुझं कसं आहे. कावीळ झालेल्या माणसागत, त्याला कसं सगळ जग पिवळच दिसतं. तसचं तुला पण दिसतं बघ.
आरोही :
ए सातारकर. लई नकचडीच आहेस की. जास्त बोलू नकोस, आधी फर्स्ट क्लास मिळवून दाखव. सेकंड क्लासची गाडी मला बोलतेय. मला नाही तुलाच झाली असेल कावीळ
(मानसी व आरोही हसतात.)
वेदिका :
ए बंदर छाप बिडी, चल सटक हितून, तुला दिसत नाहीं का आम्ही एक्सर साईज करत आहोत ते. अन् आम्हाला किती मार्क पडतात याचे तुला काय लागलेय. बघुया की तू फर्स्ट क्लासची गाडी कुठं जाती ते. पुढली परीक्षा झाली की बसशील जाऊन माळावर काटक्या गोळा करत. अन् तुझ्या या दोन माकडिणींना पण सोबत घेवून जा. झोळी वाल्या कुठल्या.
आरोही :
तरी म्हंटल प्राजूची चिमणी कशी बोलली नाही अजून, तिच्या हमाली करणारी तू. मला शिकवतेस, तुझं मार्क लिस्ट बघ आधी. मग ठरव मी काटक्या गोळा करते. की तू जाळीतील करवंद काढून विकत बसतेस राधानगरीच्या बाजारात ते.
(त्या सर्व चिडून आरोहीकडे पहात असतात.)
वेदिका :
थांब दाखवते तुला
(त्या जिना चढू लागतात. इतक्यात श्वेता)
श्वेता :
ए मागे फिरा, तिच्या नादाला लागू नका. आपल टार्गेट मिस नको व्हायला.
अनुजा :
बघतेस ना श्वेता कशी चुरूचुरू बोलते ती बेडकी.
श्वेता :
बोलू देत, आज तिचा दिवस आहे. उद्या आपला असेल.
( पावलांचे आवाज येवू लागतात.)
(वॉर्डन कमला शिरसाट राऊंडला येत असते.)
तन्वी :
आरोही, चल गप उगाच भांडण नको सकाळी सकाळी, कमळाबाई येतेय.
(आरोही कुस्तीत नजरेने पहात जाते.)
Cut to……
……… …….. …….. …….
No comments:
Post a Comment