शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

सोमवार, २३ मार्च, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २

अस्तित्व भाग २

क्रमशः पुढे........ चालू...

 गणपतराव, “ आता इथं लग्नाचं काढायची काही गरज आहे का ? ये बोल शंभ्या तुझं किती पैसे ते? आता मारतो तोंडावर तुझ्या”

( गणपत पाटील पैसे देतोय म्हंटल्यावर शंभू पुढे येतं होता. इतक्यात शकुंतला मधी बोलली.)

शकुंतला, “ अय , लई पैसे नाचवू नका, व ये शंभ्या एका रुपयाला जरी हात लावलास तर हात तोडीन, मग आंबे मोजायचे सोड तुला पाटवान सुद्धा धुवायला यायचं नाही. “

शकुंतला झटकन पुढे गेली. व नवऱ्याच्या हातातले रुपये हिसकावून घेतले.

शकुंतला, “ आणा इकडं ते वाण सामान आणायचं आहे.”

शंभु कडे पाहून तिने मुरका मारला. व त्याला म्हणाली,

“ शंभू महाराज , चला घर गाठा, आता. आंब्याच मुरून लोणचं झालं की पाठवून देऊ घरला.”

 शकुंतला उर्मिलेजवळ जात,

शकुंतला, “ चल ग कारटे, सुगंधा ती घागर घे आत, सकाळच्या पाळी कुणा कुणाची तोंड बघायला लागतात. चल नालायक कुठली.”

 बाकीचे सर्वजण आपापल्या मुलींना घेऊन घरी जातात. शंभू पण निघून गेला. थोड्या वेळाने शकुंतला पाटलीनीनं उमेला जेवायला वाढलं. ती जेवली, जेवण झाल्यावर.

शकुंतला, “ काय झालं का जेवून?”

 उमा, “ हो, झालं की.”

 शकुंतला, “ मग सांग, आंबे काढलेस की नाही.”

उमा, “ छे ग, कुठले आंबे. तो जगन्या थापाडा, काय पण सांगतोय.”

शकुंतला, “ हो का, मग शंभू काका तर ठारंच वेडा असणार. अन् तू तेवढी शहाणी माझी बाय ती.”

उमा, ( लाजत खाली मान घालून.)

हो.

( इतक्यात चुलीतील तापलेले उलातणे काढून जोराचा चटका उमेच्या पायाला दिला. ती ओरडली. काय झालं म्हणून गणपती पाटील पाळण्यावरुन खाली उतरुन आत आला. उमा रडत होती. तिच्या पायातून वेदना होत होत्या. ते पाहून. )

गणपतराव, “आवागलीस काय? अस तरण्या ताठ पोरीला कुणी भाजतं का?”

शकुंतला, “ हो अवागलेय, ही त्या शंभ्याला गंडवू शकेल मला नाही. सांग गेलतीस की नाही आंबे आणायला.”

उमा, “ नाही जायला, आबा वाचवा मला. आई बघा कशी मारतेय.”

शकुंतला, “ ये, या शेंड्या दुसऱ्या कुणाला तरी लाव.”

गणपतराव, “ अहो, एवढ म्हणते तर गेली नसेल. तुम्ही पण उगाच कुणाचं तरी ऐकून पोरीला मारता .”

शकुंतला, “ उगाच नाही मारत, एवढी दुधखूळी नाही मी. नव्या पोलक्यावरील हे आंब्याच्या जराचे डाग व गाभोळल्या आंब्याचा वास कळतो मला. मी पण घाट कोकणाचीचं आहे हो. मला खोटं बोलतीस, घरच्या आंब्याची झाडे नाहीत का? ते तिकडं कलमडलीस, मला विचारायच्या आधी बाहेर गेलीस तर डोकल्या मोडून ठेवीन. अन् कुणा पांगळ्याच्या गळ्यात बांधीन.”

( इतक्यात मागल्या दराने महादेवाच्या देवळातून आलेल्या म्हातारीला उमेच्या हुंडक्यांचा आवाज ऐकू आला. ती आत आली. उमेला रडताना पाहून तिच्याजवळ जात.)

आऊ, “ उमा, रडायला काय झालं? कुणी काय केलं? ते सांग मला.”

 उमा, “ आईनं भाजलं.”

 आऊ, “ काय भाजलं, गण्या ये गण्या.”

गणपतराव आत आले.

आऊ, “ काय चाललंय तुझ्या बाईचं. तिला म्हणावं म्हातारी जीत्ती हाय अजून. तुमच राज येऊ द्यायची नाही. माझ्या नातीला भाजती. जा म्हणावं माहेराला.”

शकुंतला, “ अहो, तुम्हाला सांगते, गप्प रहा म्हणावं, म्हातारीला. नाहीतर आता पोचवा मला माहेरी. “

आऊ, “तिथं ठेवलय, डबोलं तुझ्या बापानं. जा उकरून खा जा. पोरीला का भाजलस ते सांग आधी.”

शकुंतला, “ त्या देवळात जाऊन चकाट्या पिटण्यापेक्षा जरा नातीकडं लक्ष द्या म्हणावं. लोकांची आमराई उतरुन आलिया.”

 आऊ, “ कोण ,म्हणतं. “

शकुंतला, “ तो शंभ्या आला होता कोकलत, इथवर, नको ते बोलतं होता. कोण सहन करणार?”

आऊ, “ गावाला काय शेंडा न बुडका, तू का गं हलक्या कानाची.”

शकुंतला, “ हलक्या कानाची बरी असेन, बयेचा ड्रेस बघ, कसा डागाळलाय.”

म्हातारी, “ कशाऊन ते आंब्याचे डाग, तू सांगतेस म्हणून, बडी संशोधक झालीस की.”

 शकुंतला, “अहो, तुम्हासनी सांगते, त्या म्हातारीच्या तोंडाला कुलूप लावा. नाहीतर मी निघाले.”

आऊ, “ तू बरी जाशील. अन् ह्यो खटारा काय तुझी आवशी सांभाळलं काय?”

शकुंतला, “ तीनच ह्यो घाणा घातलाय, व मला इथं दिली.”

गणपतराव, “ ये बायांनो गप्प बसा आता. घरात शांती नंदू देत.”

तशा त्या दोघी गप्प बसल्या. उमेच्या मैत्रिणी दारा आडून वाकून बघत होत्या.

लता, “ काय झालं असलं ग.”

 जया गायकवाड, “ काय झालं म्हणजे, काकूला कळलंय, उमेला भाजलं नव्हं.”

 प्रभा, “ बिचारी उमा, हे सगळं त्या जगन्यामुळं झालंय.”

 राजश्री, “काय पण होऊदेत, त्या जगन्याला सोडायचा नाही.”

लता, “ सोडायचा तर नाहीचं, पण चांगली अद्दल घडवायची.”

…… ……. ….. ….

क्रमशः पुढे.....

मंगळवार, १७ मार्च, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १

 I Iश्री गणेशाय नमः ll

I lअस्तित्व ll

                                 - लेखक : निशिकांत हारुगले 

घाट कुंतल कोल्हापूर जिल्यातील दक्षिणेतील भाग, अपरान्त कोकण प्रदेशास लागून असलेला भाग, या भागातील हिरव्या गर्द झाडीत वसलेलं गाव आसगाव, गावाच्या बाहेर शंभू माळ्याच्या आमराईतील झाडावर उर्मिला ही गावातील गणपत पाटलाची मुलगी चढलेली होती. ती वरून आंबे तोडून खाली टाकत होती. झाडाखाली उभा असलेली गायकवाडची जया वरून टाकलेले आंबे झेलत होती. वाण्याची प्रभावती खालच्या अंगाला उतरणीवर उभा होती. ती वाटेवरून कोण येतं का ते पहात होती. नरसू भटाची राजश्री बाजूला उभा होती. तिचे हात पाय थरथर कापत होते. ती जयाला मधून मधून आटप म्हणत होती. थोड्या बाजूला झाडातील गेचक्यात उभा राहून कुंभाराची लता रस्ता निरखत होती. तिला शंभू माळी काठी घेऊन येताना दिसला. त्याच्या पाठोपाठ जगन हसत, खिदळत येत होता. शंभू माळी बडबडत होता.

शंभू : “आजकाल पोरांपेक्षा या पोरीच वांड झाल्यात. आंबे उतरुन खायला सोकावल्यात, मेली ती शाळा सकाळची कशाला ठेवली सरकारने या दिवसात? त्या मास्तरांनाही काम नको, हे बघ जगण्या खरंच गेल्यात त्या.”

 जगन : “होय काका, मी माझ्या कानांनी ऐकलंय. त्या आडावर पाणी भरायला आल्या होत्या. तेव्हाच त्यांचं ठरलंय. ती उर्मी त्यांची सरदार आहे बघा.“

शंभू : “ ती गण्या पाटलाची पोरगी ना, जन्मताच आईला खाल्ली, व आता पोपट होऊन माझे आंबे संपवतीय काय ? सोडतच नाही तिला. “

वळणावर शंभू माळी दिसताच लताने ‘कुहू, कुहू’ इशारा केला. आवाज ऐकताच उर्मिला झाडावरून लगेच खाली उतरली. तोपर्यंत काढलेले आंबे गायकवाडच्या जयाने उतरणीवर उभा असलेल्या प्रभेकडे दिले. ती वेगाने विहिरीकडे गेली. व सर्व आंबे एका घागरीत टाकले. व ती डोईवर घेतली. दुपारची वेळ होती. कोणी पाणवठ्यावर नव्हते. दुसरी कळशी काखेत घेऊन ती वाटेला लागली.

माळी व जगण्या बागेत यायच्या आत त्या सगळ्याजनी उतरणीवरून पाणवठ्यावर आल्या. व आपल्या भरलेल्या घागरी घेऊन वाटेला लागल्या.

बागेत आल्यावर ताजी पाने एका झाडाखाली पडलेली होती. तसेच एक कैरी देखील शंभू माळ्याला सापडली. ती घेऊन ते दोघे पाणवठ्यावर आले. मुलींकडे पहात.

शंभू माळी : “ए चोरांनो, आंबे काढून खाताय काय?”

जया : “ काय मामा, कुणाला चोर म्हणताय?”

शंभू माळी , “ कुणाला म्हणजे तुम्हाला, माझा आंबा उतरला नव्ह, पाडाला आलेला.”

लता, “ कोण म्हणतंय, आम्ही तर बाई अडावर पाणी भरताव. “

शंभू, “ मला जगन्यान सांगितलंय, काय ग उमा तू या चोरांची सरदार नव्हं. चल तुझ्या बापाकडं.”

उमा , “ माळी काका उगाच नको ते आरोप नको, पुरावा काय?”

शंभू, “ हा काय, जगन्या आहे की पुरावा.”

( खिडमुड्या जगन पुढे आला. आणि काका फुगवून दाखवू लागला. )

उमा, “ ये चल, माग सर, वार आलं तर उडून जाशील. हा पुरावा द्यायला, हा काय कॅमेरा आहे का फोटू?”

 शंभू, “ मुकाट्याने आंबे दे. नाहीतर चल तुझ्या बापाकडे.”

 उमा, “ जावा की मग वाट माहित आहे ना वाड्याची, काय कंदील घेऊन मुराळी पाठवून देऊ.”

जगन्या, “ बघा काका, कशी उलट बोलते तुम्हाला.”

जया, “ जगन्या , हाड पाहिजेत नव्हं जाग्याला की ढकलू विहिरीत. “

जगन मागे सरला. व काकामागे उभा राहिला.

जगन, “ बघा काका चोर ते चोर, आणि वर शिरजोर.”

शंभू, “ चला दाखवतोच तुम्हाला माझा हिसका, चला तुमच्या घरी. “

लता, “ जावा पुढे, येतो पाणी घेऊन आम्ही.”

 शंभू, “ कशाला, डोक्यावर ओतायला.”

 जया, “ हो बसा की मड्यागत , अखंड घागरच ओतते.”

 लता, “ घागर कशाला ओततेस, सरळ मडकच फोड की.”

शंभू, “ काय नालायक कारट्या आहेत. जीवावरच उठल्यात माझ्या. थांबा दाखवतोच, जातोच प्रत्येकीच्या घरला.”

 शंभू व जगन तावातावानेच निघाले.

…… ….. ….

प्रसंग दुसरा

शंभू माळी व गगन पुढे तावातावाने निघालेले पाहून

प्रभा , “ आता काय करायचं ग.”

उमा , “ शंकध्वनी करायचा त्या जगन्याच्या नावानं?”

प्रभा, “ पण आंबे कुठे ठेवायचे?”

लता, “ ठेवायचे की सरला काकूंच्या पिंजराच्या व्हळीत.”

राजश्री, “ आता ग काय करायचे? त्यो घरलाच निघालाय, आमचा अण्णा चेचणार मला.”

जया, “ ये भित्री भागुबाई, गप्प बस, ये लता व प्रभा दोघी जाऊन आंबे लपवा. पळा जावा लवकर, या शंभू काकाला सांभाळतो आम्ही, पण हे भित्र, गप्प बसलं तर बरं.”

उमा, “ राजे हे बघ, किती कुणी म्हटलं तर ही कोरट्याची फुलं दाखवायची. दुसरं काही नाही. समजलं, नाहीतर वकशील सगळं. बघतोच या जगण्याला, नाही याचा बाजा वाजवला, तर नावाची उमा नाही. चला आता.”

 मुली आपापल्या कामाला लागल्या.”

 लता व प्रभाने जाऊन आंबे लपवले. व त्या सर्वजणी आपापल्या घागरी पाण्याने भरून घेऊन घरी निघाल्या.

…… ………… ………

पुढील प्रसंग

उमेच्या घराच्या अंगणात शंभू माळी कालवा करत गेला. त्याच्या मागे जगन उभा होता.

शंभूने जोराने हाक मारली.

शंभू माळी, “ ये गण्या बाहेर ये, तुझ्या लाडक्या पोरीने वानर टोळी गोळा करुन माझी आंब्याची बाग उजाडली.”

उमेचे बाबा आत ज्योत्यावर पाळण्यावर बसून झोके घेत पानाचा विडा खात होते. शेजारी पाटलीन उभा होती. त्याचा आवाज ऐकून.

पाटील, “ हा शंभ्या आणि का कोकलत आलंय.”

पाटीलीन, “ काय माहित, चला तर बघू.”

ती दोघे घरच्या बाहेर येतात. पाठोपाठ त्याची आई सुद्धा येते.

पाटील, “ ये, शंभ्या कशाला कोकलत आहेस दारात येऊन.”

शंभू, “ वा, पाटील हे आपलं बरं हाय, तुमचं, तुमच्या पोरींनं गरीबांचं नुकसान करावं, व तुमची वर दमदाटी, नाय खपवून घ्यायचा मी, सगळ्या गावाला बोंबलून सांगणार तुझ्या पोरीची करणी.”

गणपतराव पाटील, “ ए शंभ्या, गप काय बोलतोयस.”

शंभू माळी, “ अरे , गावकऱ्यानो, बघा याच्या पोरीनं माझा आंबा उतरला. अन् हा बघा कसा पाटीलकी करतोय.”

गणपतराव, “ ए माझ्या पोरींन तुझा आंबा उतरला यासाठी काय पुरावा हाय?”

( मागल्या जगन्याला पुढे बोलावत)

शंभू, “ ए , जगण्या सांग तेला?”

जगन, “ हो, हो, मी माझ्या कानांनी ऐकलंय, त्या पाणवठ्यावर बोलत होत्या.”

गणपतराव, “ हे बघ, तू ऐकलास ना, मग त्यांना आंबे काढताना पाहिलंस का?”

 जगन, “ नाही बुवा.”

 गणपतराव, “ हे बघ, शंभू ऐकने व पाहण्यात चार बोटांचं अंतर असतं. व पाणी भरायला गेलेल्या मुली आंबे कशाला काढतील. तरी पण घरी आल्यावर बघू.”

शंभू, “ हे आपलं बरं हाय पाटील, मला सांगा, जवळ विहीर असताना तुमची पोर तिकडं पाणी भरायला कशाला गेली.”

शंकुतला, “ हे बघा, शंभू भाऊ, पोरींनं पाणी कुठं भरायच, ते आम्ही ठरवू, पोरींनं जर आंबे काढले असतील तर मी तिला शिक्षा करेन. आणि जर तिच्याकडे आंबे सापडले नाहीत तर मग तुलाच त्या आंब्याला उलटा टांगून नाय मिरचीची धुरी दिली तर नावाची शकुंतला नाय मी.”

तेवढ्यात त्या सर्वजणी एकामागोमाग एक हजर होतात. उर्मिलेच्या डोक्यावर पाण्याची घागर होती. तिच्या ओढणीच्या ओटीत काहीतरी होते. त्या सर्वजणी आपापल्या घागरी घेऊन उभा होत्या. राजश्रीच्या ओट्यात देखील काहीतरी होते. शंभूचा कालवा ऐकून गल्लीतील सर्वजण गोळा झाले होते. इतक्यात शंभू माळी म्हणाला, “ बघ, तिच्या ओट्यात काय ते?”

शकुंतला, “ कारटे कुठे उलतली होतीस. जवळ विहीर असताना तिकडे कशाला गेलतीस कलमडायला, आणि ओट्यात काय हाय?”

शकुंतला पुढे होणार तोच शंभू माळी पुढे झाला. व तिचा ओटा खुला केला. त्यातून कोरट्याची फुले खाली पडली. तशी डोईवरील घागर शेजारच्या सुलभा मावशीकडे देत.

उर्मिला, “ बघ ना ग, आई कसा हिसडा मारतोय, माझी फुलं पाडली बघ.”

तशी शकुंतला पुढे होत,

“ ये, गाभ्या फणसा, बघितलास नव्हं, फुलं होती ते. आणि चोर म्हणतोस व्हय र…. माझ्या पोरीला म्हसोबा, तुला सोलीन नारळ सोलल्यासारखा. दोन चार आंब्यापाई माझ्या पोरीला बोल लावतोस व्हय. जा पेटून पडू देत तुझी बाग ती, नाय ग माझी बाय ती रडू नकोस.”

शंभू, “ नाटकं करत्यात, ये राजे तुझ्याकडं असतील आंबे,”

( शंभू पुढे झाला. व त्याने राजश्रीच्या ओट्यावर हात मारला. तिच्या ओट्यातील चिंचा खाली पडल्या. तशी राजश्री रडू लागली. तेव्हा राजश्रीची आई बोलली.)

“ ये शंभ्या चिंचतला अन आंब्यातल फरक कळतोय की नाही. काय म्हणते मी, गोटीवानी डोळं दिल्यात ना देवानं. मीच सांगितल्या होत्या. वाटेवरील चिंचेच्या चिंचा अणायला. नालायक कुठला? भटाच्या पोरीला हात लावायला. सत्यनारायण तरी पावलं का तुला?”

 शंभू, “ लई खऱ्याच्या पुतळ्या असतील ना या, तर शपथ घ्यायला सांग.”

 उर्मिला, “ हो, घेते मी, माझ्या मेलेल्या आईची शपथं.”

 शंभू, “ काय बिलंदर आहे हो कारटी, मेलेल्या आईची शपथ घेतेय. या जित्या आईची घे.”

 शकुंतला, “ये मेल्या, माझ्या जीवावर उठलास होय. घेत नाय जा ती शपथ. तुझे आंबे गेले आडीत. जा शोध जा, माझ्या मरणावर उठलाय. जीवनाची रांगोळी केली मी या पोरीसाठी, हिचा वनवास नको म्हणून भनीमाग हा बिजोरा नव्हरा गळ्यात बांधला माझ्या. आणि आता तू आलास व्हय र, मुळावर माझ्या. गुमान जा, नाहीतर डोचकीचा आंबा फोडीन तुझ्या.”

क्रमशः पुढे .....


अस्तित्व पटकथा भाग ९

  अस्तित्व पटकथा भाग ९ अस्तित्व पटकथा भाग ९ मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film, क्रमशः पुढे चालू ........ उमाचा रिझल्ट ला...