अस्तित्व पटकथा भाग ६
क्रमशः पुढे चालू.....
कडक उन्हाळ्याचे दिवस होते. चैत्राचा महिना, कोकण (अपरान्त) देशातून एक साधू व त्याचे दोन शिष्य घाटमाथ्यावरून जंगलातून दक्षिण कुंतल ( कोल्हापूर जिल्हा दक्षिण भाग) प्रदेशात पायी चालत निघाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणवठे आटले होते. खूप चालल्याने वृद्ध साधूस खूप थकवा आला होता. वाटेत कुठेही पाणी मिळाले नव्हते. पुढे गाव आहे याची चाहूल लागली. व पाण्याच्या आशेने ते गावाकडे निघाले. ते उमाचे गाव होते. वेशीबाहेर ते शेताजवळ आले. अचानक साधूला भोवळ आली. शिष्यांनी त्यांना झाडाखाली नेले. ते तहानेने व्याकुळ झाले होते. शिष्य गुरूंना पाणी आणण्यासाठी इकडे तिकडे पाणी मिळते का शोधू लागले. तेव्हा त्यास रहाटेचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने तो गेला. तिथे उमा शेतातील औतवाल्यासाठी जेवण घेऊन आली होती. ती पाण्याची कळशी घेऊन पाणी आणायला आडावर आली होती. साधूंचा शिष्य तिच्याजवळ गेला. ती शेताकडे निघाली होती.
शिष्य , “ थांबा, थोड थांबा.”
तिने मागे वळून पाहिले.
उमा, “ कोण आपण? काय काम आहे.”
शिष्य, “ माझ्या गुरूंना खूप तहान लागली आहे. तहानेने त्यांचा जीव कासावीस झाला आहे हो. थोडं पाणी पाजा.”
उमा, “चला, देते.”
उमा आपली कळशी घेऊन गेली. व त्यांना पाणी दिले. पाणी प्यायल्यावर त्यांना बरे वाटले. उमाने वाकून नमस्कार केला. तेव्हा साधूंनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांना भूत, वर्तमान , भविष्य दिसत होते. त्यांनी उमेला बसायला सांगितले.
साधू, “बाळ, इथे बस.”
उमा खाली बसली. साधूंनी तिच्या दोन्ही डोळ्यांच्या भुवयांच्यामधी आपला अंगठा ठेवला. ओम उच्चार केला. उमेच्या शरीरात अंतर्गत प्रवाह जागृत झाला. ती एकदम शांत झाली. उठून तिने पुन्हा नमस्कार केला. व ती आपली कळशी घेऊन निघाली.
….. …… …….
उमा गेल्यावर शिष्यांनी साधूला विचारले.
शिष्य, “ स्वामी आपण त्या मुलीला कोणता मंत्र दिलात.”
साधू, “ बाळ मी तिला मंत्र नाही. तर तिच्या भविष्यासाठी तिच्यातील ऊर्जा शक्ती जागृत केली. जिच्या जोरावर ती आपले रक्षण करेल. व आता ती शिवमय आहे.”
शिष्य, “ पण हे सृष्टीच्या नियमात आहे का? ती त्याचा दुरुपयोग करणार नाही ना.”
साधू, “ अशक्य, जी भर उन्हात त्रास घेऊन सिंधलेले पाणी स्वतः न पिता इतरांना देते. ती देवस्वरूप असते. अन् मी काही नियम भंग केला नाही. तिने थंडगार जल देऊन माझी तृषा शांत केली. मी तिची थोडी मदत केली. चला पुढे जाऊ.”
त्यांनी पुढे प्रस्थान केले. शेतात उमा आली. तिने पाणी व जेवण औतवाल्यास दिले. त्या दिवसापासून उमाचा स्वभाव बदलला. ती खूप शांत राहू लागली. कुणालाही उलट बोलणं तिचं बंद झालं. घरातील सर्व कामे ती व्यवस्थित कुणी न सांगता करू लागली. शाळेत देखील खूप शांत वावरू लागली. तिच्या वागण्याचे घरातील, गावातील व शाळेतील सर्वांना आश्चर्य वाटत होते.
एके दिवशी घरात बसल्यावर.
शकुंतला, “ अहो पाहिलत का? देव पावला म्हणायचा. आपली उमा किती शांत झालीय. कोणत काम सांगाव लागत नाही. सर्व करते. जेवण सुद्धा मस्त करते. खूप गुणी झालिये हो.”
आजी, “हो, गुणी असणारच, नाहीतर तुला पोळ्या तरी करता येतात का? म्हणे उमा गुणी आहे. हाताखाली मोलकरीण हवेय, म्हणजे ही मिरवायला रिकामी.”
शकुंतला, “ अहो, सांगा तुमच्या आईला. मी काही बसून खात नाही.”
आजी, “तो काय सांगतोय बैलोबा, मी आहे घट्ट अजून, उमाला चांगलं. स्थळ मिळत नाही. तोपर्यंत काही आकसत नाही. म्हणे जेवण चांगली करते?”
शकुंतला टाचा आपटत आत गेली.
गणपतराव , “आई, अस बोलायला हवं का? बघ ती चिडली. घरात आता कुठं सुरळीत चाललय. वाद कशाला?”
आजी, “मी वाद घालते. तिच काहीतरी म्हटली असणार. काय जादू केली कुणास ठाऊक. की मंतर फिरवला. माझी खेळत्याली बाहुली शांत झाली. घर कसं खायला उठतं.”
गणपतराव, “बाहेर होतीस देवळात, तेच बरं होत बघ.”
आजी, “देवळातच जाते, अजून मसनात जायला खूप लांब आहे हा. म्हणूनच हा अंगारा आणलाय.”
( लहान नातवास.)
“ बाळ, हा घे महादेवाचा अंगारा. जा लाव तुझ्या ताईला. घालू देत तांडव. अजून लहान आहे ती.”
गणपतराव, “ अगं आई, आता सोळा वर्षाची आहे ती. लहान कशी. व आपली उमा गुणी आहे. मिळेल चांगला नवरा तिला?”
आजी, “ गुणी हाय, म्हणूनच दृष्ट लागली पोरीला. “
( हात पूर्वेला जोडून.)
“ देवा, महादेव लक्ष ठेव बाबा पोरीवर.”
( पदराने आपले अश्रू तिने पुसले.)
…… …… …………
क्रमशः पुढे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा