क्रमशः पुढे चालू ......
दुसऱ्या दिवशी शाळेतील मधल्या सुट्टीत जगन मुलांसोबत खेळत होता. मुली शाळेच्या मैदानाजवळ असलेल्या वडाच्या पारावर बसलेल्या होत्या. उमा ही तिथे बसलेली होती. तिच्या पायाला औषध लावलेलं होतं. बाकीच्या मैत्रिणी बाजूला उभा होत्या.
प्रभा, “ जास्त दुखतंय का? कळा थांबल्या का?
उमा, “ थोडीशी चमक मारतेय अजून, मला कळलच नाही. उलातन चुलीत का घातलेय ते.”
लता, “ तुझी आई इतकी कठोर कशी गं.”
राजश्री, “ सावत्र आहे ना, म्हणून..”
उमा, “ तसं काही बोलू नकोस, माझ्यासाठी सगळं करतेय ती. लहान भावापेक्षा माझ्यावर जीव आहे तिचा. काल भाजलं पण औषधं ही तीनचं लावलं.”
जया, “हे आपलं बरं हाय की, आधी लाथा घालायच्या व नंतर जेवायला बोलवायचं. असं कोकिळेच प्रेम कशाला पाहिजे. कावळ्याच्या घरट्यात अंडी देणारं.”
उमा, “तस नाही हं, उलट मी कोकिळेच पिल्ल, ती कावळा होऊन सांभाळतेय.”
जया, “ बर, ते सोडा, त्या जगन्याचं काय करायचं ठरवलंय.”
उमा, “त्याला धडा शिकवायचा कसा? याचाच विचार करतेय.”
प्रभा, “बघ तो घोडा, चांगला दहावीला गेलाय. तरी लहान पोरात कसा हुंदडतोय. चाडगा पावटा कुठला.”
राजश्री, “याचं काय करायचं?”
लता, “ जरा तिकडे बघ, जगन्याची नजर कशी फिरतेय त्या कडेला उभारलेल्या त्रिकुटावर.”
जगन खेळताना तिथे शेजारी उभारलेल्या तिन मुलीतील हेमांगीकडे पाहून हसत होता.
प्रभा, “कोण त्या हेमांगी, सुशीला व सविता का?”
लता, “ ती हेमा बघ कुठे पाहतेय.”
जया, “ अगं, ती तर जगन्याकडे बघतेय.”
उमा, “ सापडलं, हे ऐका, मी सांगते ते करा आता. तो जाड्या अजिंक्य लाईन मारतो ना हेमावर. फक्त एवढंच करायचं.”
असे म्हणून उमा आपल्या मैत्रिणी लता व जयाच्या कानात काहीतरी कुजबुजली . त्या हसल्या, व अजिंक्य खेळत असलेल्या ठिकाणी गेल्या. व त्याला ऐकू जाईल अशा कुजबुज करू लागल्या.
जया, “ काय ग लता हेमा कुणाची?”
लता, “ कुणाची म्हणजे, जगन्याची.”
जया, “मग आज्याचं काय?”
लता, “ तो बसेल टिमकी वाजवत वाजंत्री होऊन लग्नात. जगन बघ किती फॉर्मात हाय.”
त्यांचे बोलणे अजिंक्यने ऐकले. व तो चिडला. व त्याने जगन्याकडे पाहिले. तो हेमांगीकडे पाहून हसत होता. इतक्यात शाळेची घंटा वाजली. सर्व मुले वर्गाकडे निघालीत. अजिंक्य जगन जवळ गेला. व त्याला लघवीला जाऊन येऊ असे म्हणाला. व त्याला शाळेच्या मुतारी मागील झाडीत घेऊन गेला. व म्हणाला, “जगन्या खिडम्या, हेमांगीवर लाइन मारतोस काय? थांब दाखवतोच तुला हिसका.”
तिथे त्याला खूप बडवला. जगन ओरडू लागला. “ आई ग, मेलो.. मेलो…”
जगण्याची हाड खिळखिळी केल्यावर तो म्हणाला, “ ते काही माहित नाही मला, येत्या रक्षा बंधनला हेमांगीकडून राखी बांधून घ्यायची, नायतर तुला नदीतच बुडवतो बघ..
घाबरलेला जगन ‘ घेतो, घेतो’ म्हणाला.
थोड्या वेळाने लंगडत, लंगडत जगन्या वर्गात आला. त्याला बाईंनी विचारलं. “ काय झाले रे, पडलास काय?”
मॅडमकड पहात नाव सांगणार तोच शेवटचे अजिंक्यचे शब्द त्याला आठवले.”
“ यातलं एक जरी कुठे बोललास तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करीन.”
जगन, “ होय जरा घसरलो. “
तो जाऊन गुपचूप आपल्या बेंचवर बसला. त्याच्याकडे बघून मुली हसू लागल्या. इतक्यात कुंभाराची लता म्हणाली, “ हेमा मालिनी पावली वाटत.”
“ हो तर ड्रीम गर्ल आहे ना ती.”
सगळे हसू लागले.
मॅडम, “ सायलेंट , गप्प बसा.”
मॅडम शिकवू लागल्या. जगन समजून गेला. की अजिंक्याला कसे समजले ते.
..,….. …….. ………
पुढील प्रसंग
दुपारची वेळ, उमा, राजश्री, प्रभा, लता, जयश्री या सर्वजणी सरला काकूंच्या पिंजरातले आंबे काढून बघत होत्या. त्यातील पिकलेले घेऊन उरलेले झाकून ठेवले. हे सर्व करताना जगनंने पाहिले. पिकलेले आंबे घेऊन त्या बाजूच्या झुडपात घुसल्या. आंबे खाऊन झाडांच्या पानांना हात पुसून पुढे पाणवठ्यावर आल्या. तिथं हात, पाय तोंड धुवून आपल्या घागरी घेऊन परतल्या.
काही वेळाने जगन घरातून एक पोतं घेऊन आला. त्याने राहिलेले आंबे त्या सरला काकूंच्या पिंजराच्या व्हळीतून काढून पोत्यात घेतले. व निघाला. जाताना त्याच्या मनात विचार आला.
जगन, ( मनात) “ जर का हे आंबे शंभू माळ्याला दिले , तर मला काय फायदा. यांना तर दोन- चार रपाटे बसतील. त्यापेक्षा घरीच नेतो. म्हणजे आपली चांदी होईल. यांना आंबे न मिळाल्याने यांचा पोपट होईल. व मला आंबे खायला मिळतील. दोन्हीकडून आपलाच फायदा.”
असा मनात विचार करत तो ते आंबे घेऊन घरी आला. व माळ्यावरील कनुगल्यात त्याने ते आंबे लपवले.
…… ……. …….
परत पाणी भरायला आल्यावर पाणवठ्यावर घागरी भरण्यासाठी पाणी लता व जया काढू लागली. उमा ते पाणी घागरीत ओतत होती. तिने नजरेने इशारा केला. राजश्री व प्रभा या सरला काकूंच्या शेतात गेल्या. तेथील गंजीत त्यांनी लपवलेले आंबे तपासले. पण काहीच सापडले नाहीत.
प्रभा, “अगं, ये आंबे नाहीत.”
राजश्री, “ काय म्हणतेस, थांब मी बघते.”
( तिने देखील तपासले. आंबे सापडले नाहीत.)
प्रभा, “ चोरले वाटतं कुणी?”
राजश्री, “ चल जाऊन सांगूया.”
त्या दोघी पाणवठ्यावर गेल्या. व इशारा करुन सांगितले.
प्रभा, “ मुरंबा गेला ढगात.”
उमा, “ कोणचा ठग.”
राजश्री, “ मडक्याला किंवा तलवारीस विचार की.”
लता व जया एकदम बोलल्या, “ आम्हाला काय माहित. चला बघू.”
त्यांनी तिथे जाऊन तपासले. आंबे नव्हते.
उमा, “ जाऊ देत, चोरीचचं धन ते चोरीलाच जायचं.”
जयश्री, “ चोरीचं कसं, हिवाळ्यात दहा - दहा रुपये देतो म्हणून त्या शंभ्यानं आम्हाकडून अखंड बाग स्वच्छ करून घेतली. व अजून शेंबडा पैसे देतोय. दिवसभर दहा माणसांनी तरी स्वच्छ केली असती का? अन् त्यांना मजुरी द्यावी लागली असती तर.”
लता, “चला आता वेळ होतोय. घरची उगाच कालवा करायची.”
त्या पाणवठ्यावर आल्या. व आपापल्या घागरी घेऊन निघाल्या.
…….. ….. …….
पुढील प्रसंग
शाळेमध्ये वर्ग भरला आहे. शिक्षक येऊन शिकवून जात होते. मधली सुट्टी झाली. मुली होमवर्क करू लागल्या.
इतक्यात जगन शेजारी बसलेल्या संजूस
जगन, “ संजू तुला काय सांगू रे, काय आमच्या इथल्या शंभू माळ्याचा आंबा, लई गोड हाय बघ. अगदी चवदार, पिकल्यावर लई भारी लागतो बघ.”
संजू, “ तू खाल्लास काय?”
जगन, “ हो की खूप खाल्लेत, हल्ली आमच्या गावात आडीला खूप आंबे पिकतात बघ.”
त्याचे बोलणे बाजूच्या मुलींच्या कानावर पडत होते. त्यांचे लेखन थांबले. थोड्या वेळाने जगन बाहेर गेला.
लता, “ उमा, ऐकलस काय? अडीचे आंबे कुठे गेले ते.”
उमा, “ ऐकलं पण आणि चोर ही समजला.”
जयश्री, “ लांडगाच हाय मेला. काय पाठी लागलाय बघ. याला अजिंक्यचा प्रसाद कमी मिळाला वाटतं.”
प्रभा, “ दिसायला गोरा असला तरी, रुप राजाचं अन गुण कास्ताराचं आहेत बघ. याचं काय करूया.”
उमा, “ राजे जा, त्या सातवीतल्या विठू मांगाच्या सकीला बोलवून आन् जा.”
राजश्री, “ तिला कशाला गं,”
उमा, “ कळेलंच तुला.”
थोड्याच वेळात राजश्रीने जाऊन विठू मांगाच्या सकीला बोलवून आणले. ती दिसायला काळी पण साजरी मुलगी आल्यावर.
सकू, “काय ग उमाताई. कशाला बोलावलंस.”
उमा, “ तुझ्याकडे काम होते. एक.”
सकू, “काय ते गं.”
उमा, “ कान कर इकडे.”
( उमा तिच्या कानात कुजबुजली.)
सकू, “ पण बाटली हवी.”
उमा, “ जाताना या लतीच्या घराकडून जा. ती देईल बाटली.”
लताकडे पाहत.
उमा, “ लताबाई, भांड घ्यायला भंगारवाल्यासाठी ठेवलेल्या बाटलीतील एक बाटली हिला दे.”
लता, “देते की रोज एक येतेय घरात. वैताग आलाय नुसता. आवशीने तर काल भांडणच केलं, रोज बा पिऊन येतोय काय करेल.”
उमा, “ मग उद्या कळलंच की, कोण प्यालं ते.”
ती मुलगी निघून गेली.
उमा, “ राजू बाळ, प्रसादाचा शिरा उद्या मिळेल का?”
राजश्री, “ मिळेल की, उद्या आणते की, मला खूप आवडतो.”
उमा, “ आवडत असला तरी उद्या खायचा नाही हं, खाऊ घालायचाय, आण हो.”
राजश्री, “ मला समजलं नाही, “
उमा, “ समजेल उद्या, उगीच कुठल्या हेराने ऐकायला नको. लागा तुमच्या कामाला.”
..,. ….. …….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा